जेजुरी ( सहकार टाईम्स वृत्तसेवा ) : येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असे म्हणत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण करत जेजुरी येथे पालखी रथाचे सायंकाळच्या सुमारास स्वागत करण्यात आले. कपाळी चंदनाचा टिळा खांद्यावरी भगवी पताका, गळ्यात तुळशीची माळ , डोक्यावर तुळशीचे वृंदावन अशा लाखो वैष्णवा समवेत संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा जेजुरीत दाखल झाला. आज जेजुरीत मुक्काम असून उद्या सकाळी वाल्हे येथे मुक्कामासाठी पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे.

आज पहाटेपासूनच सासवड जेजुरीचा रस्ता लाखो वैष्णवांच्या पावलांनी फुलून गेला होता. मुखात विठ्ठल नामाचा गजर, खांद्यावर भगवा पताका गळ्यात तुळशीची माळ डोक्यावर तुळशीची वृंदावन टाळ चिपळ्या मृदंगाच्या साथीने माऊली माऊली च्या गजरात पालखी सोहळा जेजुरीच्या जवळ येताच येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष चालू होता.

जेजुरीत पोचल्यावर भंडाऱ्याची उधळण करत जेजुरीकरांनी भव्य असे स्वागत पालखी सोहळ्याचे केले.











