सोमेश्वर साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

११ ऑक्टोबरला मतदान; १२ ऑक्टोबरला मतमोजणी — अर्ज माघारीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

सोमेश्वरनगर (सहकार टाईम्स वृत्तसेवा) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया अखेर जाहीर झाली असून, ११ ऑक्टोबर रोजी मतदान, तर १२ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय तसेच सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे.

कारखान्याच्या निवडणुकीसाठी ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी छाननी होणार असून, १६ सप्टेंबर रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १६ ते ३० सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप होणार आहे.

कारखान्याचे कार्यक्षेत्र सुमारे १५० गावांमध्ये विस्तारलेले असून बारामती, पुरंदर, खंडाळा व फलटण तालुक्यांतील गावांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे चार तालुक्यांतील सहकार व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीसाठी १५ जागांसाठी मतदान होणार आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र पाच समान गटांमध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक गटातून तीन सर्वसाधारण संचालक निवडले जाणार आहेत. तसेच ‘ब’ वर्गातील सहकारी उत्पादक व बिगर उत्पादक संस्था मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जाणार आहे. अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त जाती-जमाती व इतर मागासवर्गीय या प्रवर्गांसाठी प्रत्येकी एक जागा, तर महिला राखीव मतदारसंघातून दोन उमेदवार निवडले जाणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्र दाखल : ७ ते ११ सप्टेंबर

छाननी : १५ सप्टेंबर

नामनिर्देशनपत्रांची यादी प्रसिद्ध : १६ सप्टेंबर

अर्ज माघार : १६ ते ३० सप्टेंबर

अंतिम यादी व चिन्ह वाटप : १ ऑक्टोबर

मतदान : ११ ऑक्टोबर, सकाळी ८ ते सायंकाळी ५

मतमोजणी : १२ ऑक्टोबर, सकाळी ९ वाजता

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक द्विजय आहेर यांची, तर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक सहसंचालक प्रतीक बागल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता इच्छुक उमेदवारांच्या हालचाली वाढल्या असून, आगामी काळात पॅनेल बांधणी आणि निवडणुकीच्या रणनीतीला वेग येण्याची शक्यता आहे.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा