नोकरी, व्यवसाय, गृहिणींसह नियमित शिक्षण घेता न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : YCMOU
नाशिक (सहकार टाईम्स वृत्तसेवा) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील जुलै सत्रासाठी १३ विविध विद्याशाखांतील तब्बल १३० पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका व प्रमाणपत्र शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विनाविलंब शुल्कासह १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाची संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित पदवी शिक्षणासोबत दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून आणखी एक पदवी घेता येणार आहे. तसेच मुक्त विद्यापीठाच्या दोन पदवी शिक्षणक्रमांमध्ये एकाचवेळी प्रवेश घेण्याची संधीही उपलब्ध आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार यंदा पारंपरिक शिक्षणक्रमांसोबतच विविध आधुनिक व रोजगाराभिमुख शिक्षणक्रम प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यामध्ये संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल तंत्रज्ञान, शिपिंग मॅनेजमेंट, मीडिया ग्राफिक्स, नाट्यशास्त्र, पाली भाषा, सायबर क्राईम तपास, सहकार व्यवस्थापन, डेटा ॲनालिटिक्स, कार्यालयीन सहाय्यक (न्यायिक), मानवी हक्क, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, श्वानपालक प्रबोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, मूल्य शिक्षण, भारतीय ज्ञान प्रणाली, समुपदेशन व मानसिक स्वास्थ्य, योगशिक्षक आदी आधुनिक व व्यावसायिक शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
मुक्त विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या, आपल्या वेळेनुसार आणि आवडीनुसार शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळते. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसाय करणारे, गृहिणी तसेच नियमित महाविद्यालयात जाणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष उपयुक्त संधी ठरणार आहे.
*ऑनलाईन प्रवेशासाठी संकेतस्थळ*
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच विद्यापीठाच्या नजीकच्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधूनही प्रवेशाबाबत मार्गदर्शन घेता येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळ : ycmou.digitaluniversity.ac
ऑनलाईन प्रवेश लिंक : http://ycmouadm.dulive.ac/applicant/#/login?client=YCMOU
विद्यार्थ्यांनी प्रवेशाची अंतिम मुदत लक्षात घेऊन वेळेत अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेंद्र पाटोळे आणि विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले आहे.
*१३ विद्याशाखांमध्ये १३० शिक्षणक्रम*
विद्यापीठामध्ये निरंतर शिक्षण, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे, विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, कृषिविज्ञान, शिक्षणशास्त्र, आरोग्य विज्ञान, स्कूल ऑफ डिजिटल एज्युकेशन, संगणकशास्त्र, महाज्ञानदीप, ग्रामीण विकास व उद्योजकता, ललित कला केंद्र तसेच व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास या विद्याशाखांमधील एकूण १३० शिक्षणक्रम प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
विभागनिहाय संपर्क क्रमांक
– अमरावती : ०७२१–२९९०३०५, ९५९५१९७०९९
– छत्रपती संभाजीनगर : ०२४०–२३१०६६/७७, ८३७९९९०२३६
– मुंबई : ०२२–२३८७४१८०/८३/८७
– नागपूर : ०७१२–२९९९३८१, ९४२२२४७२९५
– नाशिक : ०२५३–२३१७०६३, ९४२२२४७२९७
– पुणे : ०२०–२९९९३०४४/४५
– कोल्हापूर : ०२३१–२९९११७१/७२, ७४४७६०७०२२, ७०३८६०७०२३
– नांदेड : ९४२२२५८५५७, ९५५२३७१४४३
१५ सप्टेंबरची मुदत चुकवू नका!
दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची संधी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीचा मार्ग अधिक सक्षम करावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.








