‘सोमेश्वर’ उभारणार ‘अजितदादा स्मारक’; कारखान्याच्या ६२ व्या वार्षिक सभेत सभासदांचा निर्णय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सोमेश्वरनगर (सहकार टाइम्स वृत्तसेवा ) गेली चौतीस वर्षे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या स्मरणार्थ कारखान्याच्या वतीने ‘अजितदादा स्मारक’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखाने घेण्यात आला. तसेच स्मारक, क्रीडा संकुल व अन्य शिक्षण सुविधांच्या उभारणीसाठी भागविकास शिक्षण निधीतून प्रतिटन ५० रुपये कपात करण्यास सभासदांनी मंजुरी दिली.
सोमेश्वर कारखान्याची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत व उत्साहात पार पडली. याप्रसंगी सुदाम इंगळे, नंदकुमार जगताप, संभाजी होळकर, राजवर्धन शिंदे, राजेंद्र यादव, माणिक झेंडे, विजयकुमार सोरटे यांच्यासह संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वपक्षीय पाठिंबा व मंजुरी
भागविकास निधीअंतर्गत अजितदादा स्मारक आणि शिक्षण निधीअंतर्गत क्रीडा संकुल, कॅन्टीन, प्रवेशद्वार आदी कामांसाठी एकूण ५० रुपये कपातीचा प्रस्ताव अध्यक्षांनी मांडला. या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहाजी काकडे, प्रमोद काकडे; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सतीश खोमणे, दत्ताजी चव्हाण; भाजपकडून दिलीप खैरे; शिवसेनेकडून प्रवीण जगताप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हनुमंत भापकर यांनी एकमुखी पाठिंबा दर्शवला. याशिवाय सतीश सकुंडे, रमाकांत गायकवाड, रूपचंद शेंडकर, बाळासाहेब गायकवाड, शामराव धुमाळ आदींनी स्मारकाबद्दलची भूमिका मांडली.
गाजलेला ‘जगतप विरुद्ध जगताप’ सामना
वार्षिक सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी ३८०० रुपये प्रतिटन दर अमान्य करत सरसकट ४००० रुपये दराची मागणी लावून धरली. यावर उत्तर देताना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी, “अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, परंतु ताळेबंद पाहूनच योग्य व रास्त भाव दिला जातो,” असा खुलासा केला. यानंतर वीजखर्च, आत्मनिर्भर कर्ज, सेवा संघ तरतूद आणि उसाच्या उताऱ्यावरून राजेंद्र जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष व मुख्य लेखापाल योगिराज नांदखिले यांनी सविस्तर खुलासे दिले. चर्चेच्या शेवटी राजेंद्र जगताप यांनी संचालक व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
अध्यक्षांनी व्यक्त केली दिलगिरी
शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी खासदार पार्थ पवार यांचे छायाचित्र अहवालात न छापल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना, “अनावधानाने छायाचित्र छापायचे राहून गेले,” असा खुलासा करत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलगिरी व्यक्त केली.
या सभेत केतन भोसले, कांचन निगडे, संग्राम होळकर, विराज मदने यांनीही विविध प्रश्न मांडले. भविष्यात कारखान्यामार्फत ठिबक सिंचन प्रणालीचे पाइप तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा मानस अध्यक्षांनी व्यक्त केला. अहवाल वाचन कालिदास निकम यांनी केले, तर आभार किसन तांबे यांनी मानले.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा