फरांदे नगर (ता. बारामती) प्रतिनिधी : मौजे फरांदे नगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे प्रसन्न प्लाझा सहकारी गृह रचना संस्था मर्यादित, निरा यांच्या सहकार्याने रक्तदाब व हृदयविकार प्रतिबंधासाठी योग प्रशिक्षण शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन योग शिबिरातील जेष्ठ सहभागी साधक श्री. अमोल टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरास परिसरातील महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १५ साधकांनी सहभाग नोंदवला असून, त्यामध्ये २६ ते ६० वर्षे वयोगटातील सहभागींचा समावेश होता. शिबिरादरम्यान दररोज सकाळी ४५ मिनिटे योगासने, प्राणायाम व ध्यान यांचा नियमित सराव घेण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश योग व प्राणायामाचा उच्च रक्तदाब (BP) व हृदयाच्या आरोग्यावर होणारा परिणाम प्रत्यक्ष अभ्यासाद्वारे तपासणे हा होता. त्यानुसार शिबिराच्या कालावधीत सहभागींचे रक्तदाब व हृदयगती मापन नियमितपणे करण्यात आले.
शिबिरात विविध प्रकारची योगासने, प्राणायाम व ध्यान साधना प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करून घेण्यात आली. या सरावामुळे सहभागींच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसून आल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री. अमोल टिळेकर यांनी, “सर्व साधकांनी या शिबिराचा मनापासून लाभ घ्यावा व योग-प्राणायामाचा नियमित सराव करून निरोगी जीवनशैली अंगीकारावी,” असे आवाहन केले.
सदर योग शिबिर हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या क्षेत्रीय अभ्यासक्रमांतर्गत एच. व्ही. देसाई महाविद्यालय, पुणे यांच्या सहकार्याने डॉ. धनंजय इंचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज फरांदे यांनी आयोजित केले होते.
एकंदरीत, हे योग प्रशिक्षण शिबिर आरोग्यवर्धक व अभ्यासपूर्ण ठरले असून, परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात या उपक्रमाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.










