स्थूलता व योग

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

स्थूलता व योग

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥

ज्याचा आहार-विहार संतुलित असतो, कर्म योग्य असते आणि झोप-जागरण योग्य असते, त्याचे दुःख दूर होतात.

       आजच्या आधुनिक युगात स्थूलता ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. आजच्या गतिशील जगात जीवनातील बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक ताणतणाव आणि तंत्रज्ञानावर वाढलेले अवलंबित्व आणि धावपळीचे जीवन  यांमुळे जगभरात स्थूलतेचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. स्थूलता ही केवळ शरीराच्या आकाराशी संबंधित समस्या नसून ती अनेक गंभीर आजारांचे मूळ कारण  आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, सांधेदुखी, श्वसनाचे विकार आणि मानसिक समस्यांचा धोका स्थूल व्यक्तींमध्ये अधिक आढळताना दिसून येतो  .

योग ही भारताची अति  प्राचीन आणि वैज्ञानिक  जीवनपद्धती आहे. योगाच्या नियमित सरावामुळे शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल निर्माण होतो.  स्थूलता कमी करण्यासाठी योग अत्यंत प्रभावी साधन मानले जाते . योगासन, प्राणायाम, ध्यान आणि योग्य आहार यांच्या साहाय्याने वजन नियंत्रणात ठेवता येते आणि निरोगी जीवन जगता येते.

शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात चरबी साठल्यास त्या स्थितीला स्थूलता म्हणतात. शरीराचे वजन उंचीच्या प्रमाणात जास्त झाल्यास व्यक्ती स्थूल मानली जाते. स्थूलतेचे मोजमाप करण्यासाठी बॉडी मास इंडेक्स (BMI) वापरला जातो. स्थूलतेमुळे शरीराच्या विविध अवयवांवर अतिरिक्त ताण पडतो आणि अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होतात.

स्थूलतेची कारणे  फास्ट फूड, जंक फूड, तळलेले पदार्थ, शीतपेये, जास्त साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन हे स्थूलतेचे प्रमुख कारण आहे. शारीरिक हालचालींचा अभाव , दिवसभर बसून काम करणे, व्यायाम न करणे आणि वाहनांचा जास्त वापर यामुळे शरीरातील उष्मांक खर्च होत नाहीत .   तणाव, चिंता आणि नैराश्यामुळे अनेक व्यक्ती जास्त प्रमाणात अन्न सेवन करतात. यामुळे वजन वाढते .  काही व्यक्तींमध्ये स्थूलतेची प्रवृत्ती आनुवंशिक असते.  थायरॉईड विकार, इन्सुलिनचे असंतुलन किंवा इतर हार्मोनल समस्या वजन वाढीस कारणीभूत ठरू शकतात ,  पुरेशी झोप न मिळाल्यास भूक वाढविणाऱ्या हार्मोन्समध्ये बदल होऊन वजन वाढू शकते .

स्थूलते मुळे आपल्या शरीरावर अनेक  दुष्परिणाम दिसून येतात . स्थूलतेमुळे टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढतो. जास्त चरबीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो. स्थूल व्यक्तींमध्ये रक्तदाब वाढण्याचे प्रमाण जास्त दिसून येते . अतिरिक्त वजनामुळे गुडघे, कंबर आणि सांध्यांवर ताण येतो. स्थूलतेमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. आत्मविश्वास कमी होणे, नैराश्य, चिंता आणि सामाजिक संकोच यांसारख्या समस्या स्थूलतेमुळे  निर्माण होताना दिसून येत आहेत  .

स्थूलतेची कारणे अनेक आहेत तसेच  स्थूलते मुळे होणारे अनेक दुष्परिणाम  आहेत यावर औषधाशिवाय प्रभावी उपाय म्हणजे यॊग प्राणायाम ध्यान  असल्याचे सर्व मान्य होत आहे . योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचे एकत्रीकरण. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून जीवन जगण्याची कला आहे. योगामुळे शरीरातील सर्व प्रणाली संतुलित राहतात. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ, मन शांत आणि विचार सकारात्मक होतात.  स्थूलता कमी करण्यासाठी योग हा सुरक्षित, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे. योगामुळे शरीरातील चयापचय क्रिया सुधारते, चरबी जळण्यास मदत होते आणि मानसिक संतुलन राखले जाते.

स्थूलता कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. यात बारा स्थितींचा समावेश असतो. नियमित सूर्यनमस्कारामुळे कॅलरी खर्च होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे चरबी कमी होते , स्नायू मजबूत होतात , पचनशक्ती सुधारते , शरीर लवचिक बनते.

ताडासन या आसनामुळे शरीराचा समतोल राखला जातो आणि स्नायूंना बळकटी मिळते. शरीराची ठेवण सुधारते , पाय मजबूत होतात ,वजन नियंत्रणात राहते , त्रिकोणासन  हे आसन पोट व कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे पचन सुधारते , कंबर सडपातळ होते , शरीराची लवचिकता वाढते . भुजंगासन, नौकासन , पवनमुक्तासन , पश्चिमोत्तानासन ,  धनुरासन  या आसनामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो.  पोटावरील चरबी कमी होते ,मेरुदंड मजबूत होतो , पचनक्रिया सुधारते.  गॅस व बद्धकोष्ठता कमी होते. या आसनामुळे संपूर्ण शरीराला ताण मिळतो. पचन सुधारते ,वजन नियंत्रणात राहते. मन शांत होते.

स्थूलतेसाठी असणाबरोबरच  प्राणायाम हि महत्वाचा असा आहे यात  कपालभाती प्राणायाम मध्ये जोराने श्वास बाहेर सोडला जातो. पोटावरील चरबी कमी होते. चयापचय वाढतो.  शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.  भस्त्रिका प्राणायाम जलद गतीने श्वास घेणे आणि सोडणे ही या प्राणायामाची वैशिष्ट्ये आहेत. ऊर्जा वाढते. वजन कमी होण्यास मदत होते. अनुलोम-विलोम या प्राणायामामुळे शरीरातील नाड्या शुद्ध होतात. मानसिक ताण कमी होतो. हार्मोनल संतुलन राखले जाते. भ्रामरी प्राणायाम भुंग्याच्या आवाजासारखा नाद करत हा प्राणायाम केला जातो. मन शांत होते.  भावनिक खाण्याची सवय कमी होते.

योगासने प्राणायमाबरोबर  ध्यानामुळे मन स्थिर राहते. अनेक व्यक्ती तणावामुळे जास्त खातात. ध्यानामुळे तणाव कमी होऊन अन्न सेवनावर नियंत्रण राहते.  मानसिक शांतता मिळते , आत्मविश्वास वाढतो , ताणतणाव कमी होतो ,  जीवनशैलीत सकारात्मक बदल होतो.

 स्थूलता कमी करण्यासाठी योगाबरोबर यॊग्य आहार घेणेही महत्वाचे आहे . योग्य आहाराशिवाय स्थूलता कमी करणे कठीण असते. सात्त्विक आहारामध्ये  ताजी फळे , हिरव्या पालेभाज्या,कडधान्ये , अंकुरित धान्ये ,दूध व दुग्धजन्य पदार्थ , पुरेसे पाणी  यांचा समावेश असणे आवश्यक आहे  . याच बरॊबर  फास्ट फूड , तळलेले पदार्थ , जास्त साखर , शीतपेये , प्रक्रिया केलेले अन्न  स्थूलता कमी करण्यासाठी टाळणे आवश्यक आहे.

स्थूलता कमी करण्यासाठी योगाभ्यास करणे जितके महत्वाचे आहे तेवढेच योग्य मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार करणे गरजेचे आहे  योगाभ्यास करताना  प्रार्थना , सांध्यांचे सूक्ष्म व्यायाम , सूर्यनमस्कार असणामध्ये   ताडासन , त्रिकोणासन , भुजंगासन , धनुरासन, नौकासन  शवासन प्राणायाम  करावे कपालभाती , भस्त्रिका , अनुलोम-विलोम , भ्रामरी शेवटी  ध्यान  करावे .

योगाचे वैज्ञानिक संशोधनानुसार नियमित योगाभ्यासामुळे शरीरातील चयापचय सुधारतो, ताण निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात आणि ऊर्जा खर्च वाढतो. योगामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायू मजबूत होतात आणि मानसिक आरोग्य सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

एकूणच थोडक्यात  स्थूलता ही आधुनिक काळातील गंभीर आरोग्य समस्या आहे. अयोग्य आहार, तणाव आणि निष्क्रिय जीवनशैली यांमुळे स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे. स्थूलतेमुळे अनेक शारीरिक व मानसिक आजार उद्भवतात. योग हा स्थूलता कमी करण्यासाठी सर्वात सुरक्षित, नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे. योगासन, प्राणायाम, ध्यान आणि सात्त्विक आहार यांच्या साहाय्याने वजन नियंत्रणात ठेवता येते आणि निरोगी, आनंदी व संतुलित जीवन जगता येते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून स्थूलतेवर मात करावी आणि निरोगी जीवनाचा स्वीकार करावा.

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः।

न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन॥ 

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा॥   भगवद्गीता (अध्याय ६, श्लोक १६-१७)

अतिखाणारा, अजिबात न खाणारा, अतिझोपणारा किंवा अजिबात न झोपणारा – अशा कोणालाही योग साध्य होत नाही.

जो आहार, विहार (दिनचर्या), कर्म आणि झोप यामध्ये संतुलन ठेवतो, त्याच्यासाठी योग दुःखांचा नाश करणारा ठरतो

युवराज फरांदे

योगशिक्षक , एम.ए .योग ( प्रथम वर्ष )

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा