योग शिक्षण : निरोगी जीवनाची नवी दिशा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

योग शिक्षण : निरोगी जीवनाची नवी दिशा

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीत माणूस भौतिक प्रगती करत असला तरी मानसिक शांतता आणि शारीरिक स्वास्थ्य हरवत चालले आहे. वाढता ताण, असंतुलित आहार, मोबाईल-संगणकाचा अति वापर आणि स्पर्धेचा दबाव यामुळे आरोग्याच्या समस्या वाढताना दिसतात. अशा परिस्थितीत शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारे प्रभावी माध्यम म्हणजे योग शिक्षण होय.

योग हा केवळ व्यायाम नसून जीवन जगण्याची वैज्ञानिक आणि संस्कारित पद्धत आहे. त्यामुळे आज शिक्षण व्यवस्थेमध्ये योगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

योग शिक्षण म्हणजे काय ?

योग शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी दिले जाणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रशिक्षण होय. योगामध्ये आसन, प्राणायाम, ध्यान, यम-नियम, योग्य आहार आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा समावेश असतो.

भारतीय संस्कृती ही हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेली असून त्या परंपरेतील योग हे एक अमूल्य जीवनदर्शन आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून तो शरीर, मन आणि आत्मा यांचा समन्वय साधणारी एक शास्त्रीय जीवनपद्धती आहे. आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक व तणावग्रस्त जीवनशैलीत मानवाचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. अशा परिस्थितीत योग शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे.

योग शिक्षण म्हणजे योगाच्या तत्त्वज्ञानावर आधारित नियोजित, शास्त्रीय व उद्देशपूर्ण शिक्षण प्रक्रिया होय. या शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीला आसन, प्राणायाम, ध्यान, यम, नियम, धारणा, प्रत्याहार व समाधी यांचे ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. योग शिक्षण व्यक्तीच्या सर्वांगीण विकासावर भर देत असून केवळ शारीरिक आरोग्यापुरते मर्यादित न राहता मानसिक स्थैर्य, भावनिक संतुलन, नैतिक मूल्ये व आध्यात्मिक उन्नती साधण्यास मदत करते.

आधुनिक शिक्षणपद्धतीमध्ये बौद्धिक विकासाला अधिक महत्त्व दिले जाते; मात्र शारीरिक आरोग्य, मानसिक शांती व नैतिक जीवनमूल्ये यांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नाही. यामुळे तणाव, नैराश्य, चिडचिड, असंयम व आजारांचे प्रमाण वाढताना दिसते. योग शिक्षण ही या समस्यांवर प्रभावी उपाययोजना ठरते. योगाच्या नियमित अभ्यासामुळे शरीर सुदृढ होते, मन एकाग्र राहते आणि व्यक्तीमध्ये आत्मशिस्त व सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो.

योग शिक्षणाचा मुख्य उद्देश मानवाला आरोग्यपूर्ण, संतुलित व सुसंस्कृत जीवन जगण्यास सक्षम बनवणे हा आहे. म्हणूनच आज शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये योग शिक्षणाचा समावेश करण्यात येत आहे. जागतिक स्तरावरही योगाला मान्यता मिळालेली असून तो मानवी कल्याणाचा सार्वत्रिक मार्ग मानला जातो.

अशा प्रकारे, व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त व आवश्यक असलेली शिक्षण प्रक्रिया म्हणजेच योग शिक्षण होय.

युवराज फरांदे निंबुत बारामती

एम ए मराठी , पत्रकारिता,  योगशिक्षक

क्रमशः……

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा