दीपस्तंभ पुरस्काराने समता पतसंस्थेचा गौरव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नीरा ( प्रतिनिधी )  सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार, आर्थिक शिस्त आणि सभासदाभिमुख सेवा यामुळे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समता नागरी सहकारी पतसंस्था निरा यांना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने प्रतिष्ठेच्या दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भोर येथील निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या आर्यन रिव्हरवूड रिसॉर्ट येथे हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, विविध पतसंस्थांचे प्रतिनिधी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान


या सोहळ्यात सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी तसेच राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते संस्थेचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करत ही संस्था सहकार क्षेत्रासाठी आदर्श ठरत असल्याचे नमूद केले. यावेळी संस्थेचे मुख्य व्यवस्थापक युवराज फरांदे ,व्यवस्थापक राहुल ढोले, वरिष्ठ अधिकारी विक्रम जमदाडे, गणेश चव्हाण ,किरण रासकर उपस्थित यांनी उपस्थित राहून संस्थेच्या वतीने दीपस्तंभ पुरस्कार स्वीकारला.

भक्कम आर्थिक कामगिरी
समता पतसंस्थेची आर्थिक प्रगती अत्यंत मजबूत असून संस्थेने अल्पावधीत विश्वासार्हतेची उंची गाठली आहे. संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेताना पुढील आकडेवारी विशेष उल्लेखनीय ठरते —
एकूण ठेवी : २७६ कोटी रुपये
कर्जवाटप : १९६ कोटी रुपये
संस्थेचा स्वतःचा निधी : ४८ कोटी रुपये
सी आर एस आर : २२ टक्के
एनपीए : ० टक्के
शून्य टक्के एनपीए ही बाब संस्थेच्या काटेकोर कर्जधोरणाची आणि प्रभावी वसुली व्यवस्थेची साक्ष देणारी असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
नेतृत्व व व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण भूमिका

संस्थेचे अध्यक्ष दिलीप फरांदे, उपाध्यक्ष उत्तम आगवणे सक्षम नेतृत्वाखाली संस्था सातत्याने प्रगती करत आहे. संचालक मंडळाचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन, आर्थिक शिस्त, आधुनिक व्यवस्थापन पद्धती आणि कर्मचाऱ्यांची तत्पर व ग्राहकाभिमुख सेवा यामुळे संस्थेने विश्वासार्हतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे.

ठेवीदार सभासदांचा वाढता विश्वास

ग्रामीण व शहरी भागातील सभासदांना सुलभ आर्थिक सेवा, पारदर्शक व्यवहार आणि जलद कर्जपुरवठा यामुळे संस्थेवर सभासदांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. लघुउद्योजक, शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था सातत्याने करत आहे.

सहकार क्षेत्रासाठी आदर्श संस्था

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी समता पतसंस्थेचा प्रवास हा सहकार चळवळीच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून असल्याचे सांगितले. योग्य नियोजन, जबाबदार प्रशासन आणि प्रामाणिक कार्यपद्धती यांच्या जोरावर संस्था भविष्यात आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दीपस्तंभ पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्याला राज्यस्तरावर नवी ओळख मिळाली असून हा सन्मान संस्थेच्या सर्व संचालक, कर्मचारी व सभासदांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातल्या अनेक पतसंस्था त्यांचे पदाधिकारी संचालक मंडळ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या सीईओ सुरेखा लवांडे यांनी केले.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा