मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या ताज्या परिपत्रकानुसार, सन २०२६ मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांच्या जयंती व राष्ट्रीय दिनांच्या कार्यक्रमांच्या यादीत स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे .
दिनांक १५ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या शासन परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, २२ जुलै २०२६ (बुधवार) रोजी स्व. अजित पवार यांची जयंती राज्यभर शासकीय स्तरावर साजरी केली जाईल. या दिवशी मंत्रालयासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयांत हा कार्यक्रम नियोजनपूर्वक राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील महाविद्यालये व शाळांनाही हा परिपत्रक लागू राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, राज्यपालांच्या आदेशानुसार उपसचिव हेमंत महाजन यांनी यावर स्वाक्षरी केली आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे स्व. अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या स्मृतींना अधिकृत पातळीवर अभिवादन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.








