पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ६७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देताना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.पवार यांनी दिली.
मॅट विभागात नांदेडचा (मूळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा) डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली. यात महेंद्र गायकवाड विजेता ठरला.
अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमध्ये कै.बलभिम अण्णा जगताप क्रीडानगरीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संग्राम जगताप, माऊली खटके, काशिनाथ दाते, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी पारितोषिकेही मोठी ठेवण्यात आली आहेत. गेले पाच दिवस स्पर्धेच्या भव्य आयोजनाचा आनंद राज्याच्या जनतेला घेता आला. यापुढेदेखील या स्पर्धेचे आयोजन करतांना या स्पर्धेचे दिमाखदार आयोजनाचे आव्हान आयोजकांसमोर असेल. खेळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनदेखील प्रयत्नशील आहे. प्रत्येक खेळाच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करेल आणि अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठीदेखील आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.












