बारामती ( सहकार टाईम्स वृत्तसेवा ) ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी रविवारी पुण्यात केली. याप्रसंगी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सुनीताराजे पवार आदी उपस्थित होते.
लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक डॉ. तारा भवाळकर हे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावे, असे व्यक्तिमत्व आहे. लोकसाहित्याचा मूलगामी शोध घेणाऱ्या व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणाऱ्या मीमांसक म्हणून त्यांना ओळखले जाते. १ एप्रिल १९३९ या दिवशी जन्मलेल्या ताराबाई आज वयाच्या ८३ व्या वर्षीही लिखाणापासून समाजमाध्यमांपर्यन्त सर्वत्र कमालीच्या सक्रिय असतात. गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ त्या सातत्याने कार्यरत आहेत. साहित्य, लोकसाहित्य, लोकसंस्कृती, नाटक यांच्या सखोल अभ्यासावर त्यांचा वैचारिक पिंड उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांना पाहिले की, एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा त्यांच्यात दिसून येते.
डॉ. तारा भवाळकर (जन्म : १ एप्रिल. १९३९) या प्रामुख्याने वैचारिक लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. भवाळकर या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांशी संबंधित असून या विषयांच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला यांविषयी तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे आणि लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत भाग घेतला आहे. तारा भवाळकरांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधली. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे
डॉ. तारा भवाळकर : पुस्तके
- अभ्यासक स्त्रिया (ज्येष्ठ लेखिका मालती दांडेकर, विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून ते प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत ज्ञात-अज्ञात अशा २५ अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा परिचय करून देणारे पुस्तक)
- आकलन आणि आस्वाद (साहित्यिक)
- तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक)
- निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह)
- प्रियतमा ( गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा)
- बोरीबाभळी (रा.रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना)
- मधुशाळा (हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर)
- मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह)
- मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे
- मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद
- महामाया
- माझिये जातीच्या (सामाजिक)
- मातीची रूपे (ललित)
- मायवाटेचा मागोवा
- मिथक आणि नाटक
- यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा
- लोकनागर रंगभूमी (माहितीपर)
- लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा (माहितीपर)
- लोकपरंपरेतील सीता
- लोकसंचित (वैचारिक)
- लोकसाहित्य : वाड्मयप्रवाह
- लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर)
- लोकांगण (कथासंग्रह)
- संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर)
- स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक)
- स्नेहरंग (वैचारिक)
सन्मान आणि पुरस्कार
- पीएच.डी.च्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुणे विद्यापीठाचा पुरस्कार.
- मिरज, जिल्हा सांगली येथे २४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी भरलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- आवास (अलिबाग) येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- इस्लामपूर येथे भरलेल्या जागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- इस्लामपूर येथे भरलेल्या राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- उचगाव (बेळगाव) येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- कादरगा येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- जळगाव येथे भरलेल्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- मुंबईतील मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सुं.ल. गद्रे साहित्य पुरस्कार. (२२-१-२०१७)
- ‘लोकसंचित’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९१ सालचा पुरस्कार
- पुणे शहरात ५ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली येथे भरणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली.












