विश्व मराठी संमेलन म्हणजे पुस्तक आणि पुस्तकांचे निर्माते यांचा हा महाकुंभमेळा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा )  दि. ३१ : तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मराठी तितुका मेळवावा…’ असे सांगणाऱ्या या विश्व मराठी संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे. माझी भाषा अभिजात आहे, ही भावनाच अभिमान निर्माण करणारी आहे. आपली भाषा प्राचीन आहे, आजही प्रचलित आहे. माझ्या मराठी भाषेत उत्तम साहित्य निर्माण होतं, हे पुराव्यानिशी आपण सिद्ध केले. त्यानंतरच हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हे विश्व मराठी संमेलन म्हणजे पुस्तक आणि पुस्तकांचे निर्माते यांचा हा महाकुंभमेळा आहे.

ही मराठी जगभरातील सर्व देशात पोहोचायला हवी हे आमचे स्वप्न आहे. या स्वप्नाला प्रयत्नांची जोड दिली तरच ते साकार होईल.

वैश्विक भाषा किंवा विश्वाची भाषा म्हणजे जी भाषा सर्वांना जोडते, जात पात धर्माच्या पलिकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते. हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेत ठासून भरले आहेत. जगात सात हजार भाषा आहेत. एकट्या भारतात १२१ भाषा आहेत. जवळपास वीस हजार बोलीभाषा आपल्या देशातच बोलल्या जातात. या सगळ्या भाषांशी मराठीनं आपलं नातं जोडलं पाहिजे. तेव्हाच माझी अभिजात मराठी वैश्विक मराठी होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

मराठी सर्वार्थाने समृद्ध भाषा आहे. आता ती ज्ञानभाषा व्हायला हवी. आज तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होतंय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणजे एआयचं आहे. आता संवादाची भाषाही तंत्रज्ञान ठरवतंय. त्यामुळे आपल्या समोरचं आव्हान मोठे आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून उच्च शिक्षणावर भर दिला आहे. पण, त्यात अनेक अडचणी आहेत. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, संगणक अशा अनेक विषयांत मराठीत उत्तम पुस्तके नाहीतच. विज्ञानाच्या विषय, अभियांत्रिकीसह सर्व विषयांत मराठीतून सोपी पुस्तके येणे गरजेचे आहे. मराठी ही नुसती ज्ञानभाषा नाही तर व्यवहार्य भाषा व्हायला हवी. रोजगारासाठी म्हणजे अर्थार्जनासाठी आवश्यक भाषा व्हायला हवी. त्यासाठी आपल्या सर्वांना मिळून ठोस प्रयत्न करावे लागतील. हे प्रयत्न महाराष्ट्र धर्म वाढवण्याइतकेच महत्त्वाचे आहेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

परदेशात उच्च पदांवर मराठी मुले जास्तीत जास्त दिसावीत. हीच मुले मराठी आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे राजदूत बनतील. त्यांनी तिथे मराठी संस्कृतीचा झेंडा उंच रोवावा ही अपेक्षा आहे. इथे जमलेल्या कर्तृत्ववान मराठी जणांनी मराठी विश्व कसे बळकट होईल याचा विचार करायचा आहे.

Sahakar Times
Author: Sahakar Times

Leave a Comment

पुढे वाचा