पुणे ( सहकार टाइम्स वृत्तसेवा ) दि. ३१ : तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपला महाराष्ट्राभिमान हा फक्त, चांद्यापासून बांद्यापर्यंत, महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांपुरता मर्यादीत नाही. देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या-ज्या ठिकाणी मराठी माणसांनी झेंडा रोवला, ज्या-ज्या ठिकाणी मराठी माणसाने पाऊलखुणा उमटवल्या. इतिहासातल्या आणि वर्तमानातल्या, त्या पाऊलखुणांचा आपल्या सर्वांना आणि महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.
ते पुढे म्हणाले, मराठा ही संकल्पना जातीपुरती मर्यादित नाही. मराठी भाषा, मराठी बोली बोलणाऱ्या, सह्याद्रीच्या वाऱ्यांशी, महाराष्ट्राच्या मातीशी नातं असलेल्या, अठरापगड जाती, धर्म, भाषा, पंथाच्या लोकांना एकत्रित आणून मराठा किंवा मराठे ही संकल्पना अस्तित्वात आली, हे लक्षात घेतलं पाहिजे.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव केला. पुढील पाच वर्षातील एक तरी मराठी विश्व संमेलन परदेशात घेण्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा.
संमेलनातील तीन दिवसात कला, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रातल्या ज्येष्ठ दिग्गज मंडळी आणि नवोदित मंडळींच्या सहभागामुळे, जून्या-नव्या पिढीमध्ये संवादाचा पूल बांधण्याचं काम होत आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रातल्या, कर्तृत्ववान मंडळींना याठिकाणी भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आपल्या तरुण पिढीला मिळणार आहे.
मराठी माणसाच्या मनात, कुठेतरी कोपऱ्यात, एक न्यूनगंड असतो. तो काढून टाकण्याचं काम हे विश्व मराठी संमेलन करेल, अशी खात्री आहे. मराठी साहित्य संमेलन, मराठी विश्व संमेलन किंवा मराठी माणसाच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल, तर त्यामागे उभं राहण्याची भूमिका महाराष्ट्र शासन ती निश्चितपणे घेईल.
जगाच्या इतिहासात रयतेचे राज्य स्थापन करणारे पहिले राजे, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्माला आले. देशातली पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात सुरु झाली. बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा नेण्याचं काम, शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांनी महाराष्ट्रात केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच नेतृत्व महाराष्ट्राने केले. याच महामानवांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी भावी पिढीच्या मनात विचारांची पायाभरणी करण्याचं काम, या विश्व मराठी संमेलनातून व्हावे, अशी अपेक्षाही श्री. पवार यांनी व्यक्त केली.












