बारामती ( सहकार टाइम्स वृत्तसेवा) : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेत १२ आणि २८ टक्क्यांचे जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेत घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (ता.३) दिली आहे. त्यामुळे आता ५ आणि १८ टक्के हे दोनच जीएसटी स्लॅब राहणार आहेत.
शेती अवजारे, कीटकनाशक आणि सिंचन आदी वस्तूंवरील जीएसटी ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्राहक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असून २२ सप्टेंबरपासून नवीन कर प्रणाली लागू होणार आहे.नवी दिल्लीत ३ आणि ४ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कृषी उत्पादनांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून आता ५ टक्के करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वापरातील विविध वस्तूंवरील कर रचनेत बदल करण्यात आला आहे. तर दैनंदिन वापराच्या काही वस्तूंवरील जीएसटी शुन्य करण्यात आला आहे. तसेच ४० टक्क्यांचा नवीन स्लॅबही तयार करण्यात आला आहे.स्वातंत्र्यदिनीच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीमध्ये बदल करण्याचे संकेत दिले होते. त्यावर आता जीएसटी बैठकीत निर्णय शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना काय फायदा?
शेती अवजारे, निविष्ठा, सिंचन आदीवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. जीएसटीमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसत होती. त्यामुळे विविध राज्य सरकारांनी यापूर्वी २०२१ च्या जीएसटी परिषदेत शेतीसंबंधीत घटकांवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु त्यावेळी त्यावर परिषदेत एकमत झाले नव्हते. जीएसटी परिषदेच्या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
५ टक्के जीएसटी?
शेती अवजारे, निविष्ठा, सिंचन आदी बाबींवर आता १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॅक्टर, ट्रॅक्टरची टायर्स, विशिष्ठ जैव कीडनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सूक्ष्म आणि ठिबक सिंचन, फवारणी पंप, शेती, बागायती, किंवा वनीकरण माती तयार करणारी यंत्र, तसेच मशागत, कापणी आणि मळणी यंत्रावर आता १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी स्लॅब लागू करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत.











