बारामती ( सहकार टाइम्स वृत्तसेवा) : माळेगाव कारखाना निवडणुकीचे बाजीगर अजित दादाच. निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी धरली. मध्यरात्रीच्या वेळी सांगवी गटातून चंद्रराव तावरे, रणजीत खलाटे यांनी आघाडी घेतली आणि सहकार पॅनलचे उमेदवार चार या संख्येवर आले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी उमेदवारांची विरोधी संचालकांची हीच संख्या होती. त्यामुळे हे संचालक पुन्हा निवडून येणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या निरावागज, खांडज, शिरवली आणि बारामती गटात मात्र राष्ट्रवादीच्या पॅनेलने पुन्हा उचल खाल्ली आणि राष्ट्रवादीच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर राहिले. हीच आघाडी कायम राखत इतर मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जाती जमाती व अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार १००० ते २२०० या मतांच्या फरकाने विजयी झाले.
यादरम्यानच्या काळात काल पासून पहिल्या फेरीत सहकार बचावच्या महिला प्रवर्गातील उमेदवार राजश्री कोकरे यांनी आघाडी घेतली होती. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवार ज्योती मुलमुले या पिछाडीवर होत्या. मात्र ज्यावेळी पहाटे पुन्हा मतमोजणीला सुरुवात झाली आणि दुसरी फेरी सुरू झाली तेव्हा ज्योती मुलमुले यांनी पुन्हा आघाडी घेत आपली पिछाडी भरून काढली आणि त्या विजयी झाल्या!
सांगवी गटाचा अपवाद वगळता इतर सर्व गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर राहिले आणि हीच आघाडी त्यांनी दुसऱ्या फेरीतही कायम राखली. एकूणच निवडणुकीच्या पूर्वीचे वातावरण ज्या पद्धतीचे होते ते पाहून कोणीही चंद्रराव तावरे यांचेच पॅनल विजय होणार असे छातीठोकपणे सांगू शकला असता. परंतु पराभवाचे विजयात रूपांतर कसे करावे? हे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा शिकवले. त्यांनी मोठा वेळ या निवडणुकीसाठी दिला.











